नितेश राणेंना दिलासा ! अटकपूर्व जामीनावर पुढील सुनावणी बुधवारी

मुंबई – भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी दि. 12 जोनवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावनी पुढे ढकलण्यात आल्याने नितेश राणेंना 11 जानेवारीपर्यंत अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे.
शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी असलेले भाजप आमदार नितेश राणे आणि माजी जि.प. अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार नितेश राणेच आहेत, असा दावा राज्य सरकारने न्यायालयात केला आहे. आपला हा दावा सिद्ध करण्यासाठी याप्रकरणी राज्य सरकारच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.
यावर उत्तर देण्यासाठी नितेश राणे यांच्या वकिलांनी कोर्टाकडे वेळ मागितला. ही मागणी स्वीकारत न्यायमूर्ती सी. वी. भडंग यांनी या प्रकरणावरील सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली आहे.


