पुणे – करोनामुळे ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससी परीक्षा देता आल्या नाही, त्या विद्यार्थ्यांना एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे भरणे यांनी सांगितले. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. करोना विषाणू संसर्ग सुरू झाल्यापासून एमपीएससीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. विविध संवर्गाच्या जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली नव्हती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वयोमर्यादा वाढवून द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. राज्यातील विद्यार्थ्यांना करोनाकाळात परीक्षा न झाल्याने वयोमर्यादा संपल्याने परीक्षा देता आली नव्हती. विद्यार्थ्यांची आणि अनेक राजकीय नेत्यांची वयोमर्यादा वाढवून देण्याची मागणी होती केली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली. एकमताने विद्यार्थ्यांना एक वर्ष वाढवून देण्याचा निर्णय झाला असल्याचे भरणे यांनी सांगितले.