पुणे विद्यापीठाकडून अंतिम वर्ष विद्यार्थ्यांना दिलासा

परीक्षा नमुना प्रश्न संकेतस्थळावर आजपासून उपलब्ध होणार प्रत्येक विषयाचे 20 प्रश्न
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयाचे 20 नमुना प्रश्न संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रश्न शनिवारपासून (दि.10) संकेतस्थळावर उपलब्ध होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेचे स्वरुप प्राप्त होण्यास मदत होणार आहे.
पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी खासगी एजन्सी नेमली आहे. त्याद्वारे ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्न कसे असतात, हे माहिती होण्यासाठी गुरुवारपासून सराव परीक्षा घेण्यात येत आहे. त्यात सामान्य ज्ञान किंवा संबंधित अभ्यासक्रमाच्या बाहेरचे प्रश्न विचारले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती. त्यात सराव परीक्षा देताना अनेकांचे लॉगइन होत नव्हते. एकूण 60 प्रश्नांऐवजी 58 प्रश्न दिसत होती, हेल्पलाइन क्रमांकावर व्यवस्थित उत्तर मिळत नसल्याने विद्यार्थी वैतागले होते.
दरम्यान, प्रत्येक विषयाचा संपूर्ण प्रश्नसंच द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. ती विद्यापीठाने फेटाळून लावली होती. मात्र, आता विद्यार्थ्यांच्या सोईसाठी प्रत्येक विषयाचे
20 प्रश्न विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील. त्यादृष्टीने हे प्रश्न यंत्रणेत अपलोड करण्याचे काम सुरू झाले आहे. शनिवारी हे प्रश्न दुपारपर्यंत उपलब्ध होतील. मात्र, हे केवळ प्रश्नच असतील, त्यांचे उत्तरांचे पर्याय टाकले जाणार नाहीत. विद्यार्थ्यांनी व्यवस्थित प्रश्न वाचल्यास त्यांना उत्तर काय आहे ते समजू शकेल. तसेच यातील काही प्रश्न मुख्य परीक्षेतदेखील विचारण्याची शक्यता आहे.
1 लाख 36 हजार जणांकडून सराव परीक्षा
मागील दिवसात 2 लाख 83 हजार 501 विद्यार्थ्यांनी सराव परीक्षेसाठी लॉगइन केले आहे. त्यापैकी गुरुवारी 1 लाख 28 हजार 125, तर शुक्रवारी 1 लाख 55 हजार 364 जणांनी लॉगइन केले. यातील काहीजण दोनवेळा लॉगइन करणारेदेखील आहेत. 1 लाख 90 हजार विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देणार आहेत, त्यांच्यापैकी 1 लाख 36 हजार जणांनी सराव परीक्षा दिली असल्याचे परीक्षा विभागाने कळविले आहे.
गोपनियता अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करा
अंतिम वर्ष परीक्षा ऑफलाइनद्वारे देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्राच्या ठिकाणी विद्यापीठ नियुक्त बहि:स्थ वरिष्ठ पर्यवेक्षक अथवा भरारी पथकाची नेमणूक करण्यात येणार नसल्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे परीक्षांचे पावित्र्य व गोपनियता अबाधित ठेवण्यासाठी महाविद्यालयांनी विद्यापीठास सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी केले आहे.
पुणे, नगर आणि नाशिक या कार्यक्षेत्रात सुमारे 40 हजार विद्यार्थी ऑफलाइन अर्थात प्रत्यक्ष लेखी परीक्षा देणार आहेत. करोना पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी केंद्रावर योग्य पद्धतीने दक्षता घेण्यात येणार आहे. ही परीक्षा 12 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र, ही परीक्षा होत असताना त्या ठिकाणी महाविद्यालयातीलच पर्यवेक्षक राहणार आहेत.




