IVF: चाळीशी नंतर IVFचा विचार करताय? यशाची ही आकडेवारी नक्की पाहा!
IVF महिलेचं वय आणि तिच्या अंड्यांचं जैविक वय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. महिलांच्या शरीरात असलेली अंड्यांची संख्या जन्मापासूनच ठरलेली असते.

IVF: वयाच्या ४० वर्षांनंतर आई होण्याचा विचार करणाऱ्या महिलांसाठी IVF म्हणजेच इन-विट्रो फर्टिलायझेशन हा एक पर्याय असू शकतो. मात्र, या वयात IVF करताना यशाची शक्यता नेमकी किती असते, हा महत्त्वाचा प्रश्न असतो. नुकत्याच झालेल्या एका मोठ्या अभ्यासातून याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
ब्रिटनमध्ये १९९१ ते २०१८ या कालावधीत झालेल्या १२ लाखांहून अधिक असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजेच ART प्रक्रियांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात IVF आणि ICSI यांसारख्या उपचारांचा समावेश होता. या काळात ART उपचारांची एकूण यशाची शक्यता जवळपास दुप्पट झाल्याचे दिसून आले. १९९१ मध्ये ही यशाची टक्केवारी १४.७ टक्के होती. २०१८ मध्ये ती वाढून २८.३ टक्क्यांपर्यंत पोहोचली.
मात्र, महिलांचे वय वाढल्यानंतर स्वतःच्या अंड्यांचा वापर करून केलेल्या IVF उपचारांच्या यशात मोठी घट होत असल्याचे अभ्यासातून दिसून आले. विशेषतः ४३ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये स्वतःच्या अंड्यांद्वारे IVF किंवा संबंधित उपचारांची यशाची शक्यता ५ टक्क्यांपेक्षाही कमी राहिली.
याच ठिकाणी ‘डोनर एग्स’ म्हणजेच दुसऱ्या महिलेच्या अंड्यांचा पर्याय महत्त्वाचा ठरतो. अभ्यासानुसार, डोनर एग्सचा वापर केल्यास वय वाढले तरी उपचारांचे परिणाम तुलनेने चांगले आणि स्थिर राहू शकतात. २०१८ पर्यंत ४३ ते ४४ वयोगटातील महिलांमध्ये ART द्वारे झालेल्या निम्म्याहून अधिक जन्मांमध्ये डोनर एग्सचा वापर करण्यात आला होता. तर ४५ ते ५० वयोगटात हा आकडा ९० टक्क्यांपेक्षा जास्त होता.

IVF
महिला वयस्कर होते की अंड्यांचं वय वाढतं?
महिलेचं वय आणि तिच्या अंड्यांचं जैविक वय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. महिलांच्या शरीरात असलेली अंड्यांची संख्या जन्मापासूनच ठरलेली असते. जन्माच्या वेळी मुलींच्या शरीरात साधारण १० ते २० लाख अंडी असतात. किशोरवयात ही संख्या कमी होऊन सुमारे ३ ते ५ लाखांपर्यंत येते.
वय वाढत असताना अंड्यांची संख्या तर कमी होतेच, पण त्यांची गुणवत्ता देखील कमी होऊ शकते. साधारण २० ते ३० वर्षांच्या काळात अंड्यांची गुणवत्ता तुलनेने चांगली असते. मात्र, ३५ वर्षांनंतर अंड्यांच्या गुणवत्तेत आणि संख्येत घट होण्याचा वेग वाढतो. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होण्यासोबतच काही अनुवांशिक समस्या आणि गर्भपाताचा धोका वाढू शकतो.
IVF यशस्वी होण्यासाठी आणखी काय महत्त्वाचं?
फक्त महिलेचं वय किंवा अंड्यांची गुणवत्ता यावर IVFचं यश अवलंबून नसतं. पुरुषाच्या शुक्राणूंची गुणवत्ता, गर्भाशयाचं आरोग्य, हार्मोन्सशी संबंधित समस्या आणि एकूण आरोग्य यांचाही उपचाराच्या परिणामावर प्रभाव पडतो. धूम्रपान आणि लठ्ठपणासारख्या घटकांचाही परिणाम होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, IVF ही प्रत्येक महिलेसाठी हमखास यशस्वी होणारी प्रक्रिया नाही. प्रत्येक महिलेची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे वयाच्या ४० वर्षांनंतर गर्भधारणेचा विचार करत असल्यास स्वतःहून निष्कर्ष काढण्याऐवजी स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा फर्टिलिटी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
या अभ्यासातून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो तो म्हणजे IVF तंत्रज्ञान गेल्या काही दशकांत निश्चितच प्रगत झालं आहे; मात्र वयानुसार अंड्यांच्या गुणवत्तेत होणारे नैसर्गिक बदल पूर्णपणे थांबवता येत नाहीत. त्यामुळे ४० वर्षांनंतर IVFचा विचार करताना महिलेचं वयच नव्हे, तर अंड्यांची गुणवत्ता आणि इतर आरोग्यविषयक घटकही तितकेच महत्त्वाचे ठरतात.





