प्रभात वृत्तसेवा जेजुरी – जेजुरी येथे श्री खंडोबा देवस्थानमध्ये देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी एक आदर्श गोशाळा स्थापन करण्यात आली आहे. कै. यशवंतराव राणोजी सौंदडे आणि कै. सखुबाई सौंदडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ रावसाहेब सौंदडे यांनी श्री मार्तंड भैरव खंडेरायाच्या त्रिकाळ पूजेच्या दुग्धाभिषेकासाठी दोन गाई आणि एक वासरू, असे गोधन अर्पण केले. गुरुवारी (दि.३१) रोजी सकाळी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री महेंद्र ऊर्फ दादा वेदक यांच्या हस्ते मार्तंड गोशाळेचे लोकार्पण झाले. यावेळी मल्हार भक्त आणि अभिनेते देवदत्त नागे व हेमंतराव हरहरे उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे, विश्वस्त अभिजित देवकाते, डॉ. राजेंद्र खेडेकर, ॲड. विश्वास पानसे, अनिल सौंदडे, ॲड. पांडुरंग थोरवे, पोपट खोमणे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.दादा वेदक म्हणाले, जेजुरी खंडोबा देवस्थानच्या या कार्यक्षम विश्वस्त मंडळाने देशी गोशाळा प्रमाणेच वेदपाठशाळा, प्रवचन, कीर्तन, शिक्षण व आरोग्याशी निगडित सेवा यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. जेणेकरून संपूर्ण जगातून भाविक श्री खंडेरायाच्या दर्शनासाठी आणि ऊर्जा घेण्यासाठी येतील. प्रत्येक हिंदू कुटुंबाने आपल्या घरी एक देशी गाय संगोपन करण्याचा संकल्प केला पाहिजे.महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या गोसेवा आयोगाचेही वेदक यांनी कौतुक केले. श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरी हे जगातील एक आदर्श हिंदू देवस्थान म्हणून नावारूपाला यावे, यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.