सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे तुंग किल्ल्यावर दुर्ग संवर्धन

स्वच्छता मोहीम, टाकी साफ करणे, गडावर दरवाजा बसविण्याचे काम हाती

पवनानगर – सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने तुंग किल्ल्याच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले असून, रविवारी (दि. 28) किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांचे काम करण्यात आले.

सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले तुंगवर अनेक संवर्धनाची कामे करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्वच्छता मोहीम, टाकी साफ करणे व गाळ काढणे, गडावर सागवानी दरवाजा बसवणे आदी कामे करण्यात आली आहेत. यासाठी लोकवर्गणीतून निधी उभा करण्यात आला आहे. तसेच सह्याद्रीचे दुर्ग सेवक या कामासाठी स्वतः श्रमदान करत आहेत.

तुंग किल्ल्याची वाट बिकट असून, यावर बांधकामासाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य दुर्गसेवक स्वतःच्या खांद्यावर वाहून नेता असून, यामुळे तुंग किल्ल्याच्या संवर्धनामध्ये खारीचा वाटा उचलत आहेत. पैशाची बचत होत आहे. तुंग किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांची हुबेहूब घडवणूक करण्यात आली. या पायऱ्या रविवारी लावण्यात आले आहेत. तुंग किल्ल्यावर जाण्यासाठी रोप-वेची नियोजन करण्यात येत आहे. रोपवेसाठी उभे करण्यात येणाऱ्या खांबांच्या ठिकाणी साफसफाई व गवत काढण्याचे काम करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने बांधकाम केले होते त्यात चुना व तत्सम पदार्थ वापरले होते. त्यामुळे सुमारे चारशे वर्षे होऊनही गड किल्ले अभेद आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच वारसा घेत दुर्ग संवर्धनाच्या कामांमध्ये सिमेंट सारखे पदार्थ न वापरता पारंपरिक चुना मिश्रित रसायन वापरले जात आहे. दगडांवर घडीव काम करून त्यांचा वापर केला जात आहे. दुर्मिळ असे तंत्रज्ञान वापरल्याने खर्च अधिक होत असला तरी एकदा केलेले काम हे शेकडो वर्ष टिकावे हा यामागचा उद्देश आहे, अशी माहिती सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक गडकिल्ले दुर्लक्षित असून, सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने दुर्ग संवर्धनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दुर्ग सेवकांच्या सहाय्याने सध्या तुंग किल्ल्यावर अनेक मोठे कामे करण्यात आली असून, गडावर जाणाऱ्या पायऱ्या लावण्याचे काम सुरू आहे.
– चेतन वाघमारे, दुर्गप्रेमी.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.