छत्तीसगड – बिलासपूरमध्ये काँग्रेसच्या ‘लोकशाही वाचवा’ या कार्यक्रमादरम्यान दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. स्टेजवर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने अचानक स्टेज कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत काही नेते मंडळी जखमी झाले आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी स्टेजवर अनेक काँग्रेस नेते उभे होते. मशाल रॅली संपल्यानंतर काँग्रेस नेते सर्वसामान्यांना संबोधित करत होतो. मात्र स्टेजवर भरपूर गर्दी झाल्याने हा अपघात घडला. यात काही नेते जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. व्हायरल व्हिडिओत अनेक जण स्टेजवर उभे असल्याचे दिसते. त्यानंतर अचानकपणे स्टेज खाली कोसळतो. तेव्हा सर्वांची एकच धांदल उडाल्याचे दिसते. यावेळी उपस्थित लोक ओरडत असल्याचे देखील ऐकू येते. या कार्यक्रमावेळी काही महिला कार्यकर्त्याही उपस्थित होत्या. दरम्यान, देशातील अनेक राज्यांमध्ये काँग्रेसकडून लोकशाही वाचवा मशाल रॅली काढली जात आहे. अशातच बिलासपूरमध्येही ही रॅली काढण्यात आली होती. मात्र स्टेज कोसळल्याच्या घटनेनंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे.