बंगळुरू – कर्नाटकमधील विधानसभेच्या एकूण 224 पैकी 141 जागा जिंकण्याचा दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांनी याआधी केला होता. पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवेळी ते संबंधित आकड्यावर ठाम राहिले. व्यक्तिगत राजकीय अनुभव आणि सर्वेक्षणांच्या आधारावर आकड्याचे गणित मांडत असल्याचे त्यांनी म्हटले. शिवकुमार यांनी कर्नाटकमधील कॉंग्रेसच्या विजयाबद्दल ठाम विश्वास व्यक्त केला. कर्नाटकमुळे राष्ट्रीय स्तरावरील सत्तेचा दरवाजा कॉंग्रेससाठी खुला होईल, असे भाकित त्यांनी केले. कर्नाटकमध्ये मोदी मॅजिक चालणार नाही. तामीळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये तरी मोदी फॅक्टर कुठे चालला, अशी विचारणा त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल केली. केंद्रातील मोदी सरकार जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करू शकले नाही. दरवर्षी 2 कोटी रोजगारांची उपलब्धता, शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न यांसारखी आश्वासने पूर्ण झाली नाहीत. कॉंग्रेसने कर्नाटकला दिलेल्या हमींचे तसे नाही. दिलेल्या आश्वासनांची आम्ही पूर्तता करू. कॉंग्रेसने दिलेल्या हमींमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अस्वस्थ बनले आहेत. त्यामुळेच ते आमच्या हमींविषयी टीकाटिप्पणी करत आहेत, असे शिवकुमार यांनी म्हटले. कॉंग्रेसला सत्ता मिळाल्यास मुख्यमंत्रिपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.