खालापूर – खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या गोंधळानंतर शहराध्यक्ष रिचर्ड जॉन यांनी पत्रकार परिषद घेऊन परिस्थितीवर शिक्कामोर्तब केला. काँग्रेसचा कोणत्याही पक्षाला अधिकृत पाठिंबा नसून काँग्रेस स्वबळावर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार तौफीक कर्जीकर आहेत. मात्र शुक्रवारी (दि. २८) काँग्रेसच्या काही नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार गट राष्ट्रवादी परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार डॉ. सुनील पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्याने खोपोलीच्या राजकारणात खळबळ उडाली होती. ही परिस्थिती लक्षात घेत काँग्रेसची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष रिचर्ड जॉन यांनी अधिकृत भूमिका सादर करत म्हणाले, काँग्रेसने कोणत्याही आघाडीला किंवा उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही. आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तौफीक कर्जीकर असून काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत आहे. पक्षविरोधी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येईल. असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शहराध्यक्ष रिचर्ड जॉन, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तौफीक कर्जीकर, शहर उपाध्यक्ष हैदरअली फक्की, निवृत्ती मोरे, विलास देशमुख, जिनदत्त झरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ‘जनतेचा स्पष्ट कौल आमच्याबाजूने आहे. निकालानंतर हे चित्र अधिक स्पष्ट होईल. आम्ही पुढील निवडणुकांसाठी संघटना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ही निवडणूक लढवत आहोत.’ – तौफीक कर्जीकर, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार.