कोलकता : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी गुरूवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. त्यामुळे दोन्ही पक्षांत मनोमिलन होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. कॉंग्रेस प्रमुख घटक असणाऱ्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत तृणमूलही सहभागी झाला. मात्र, त्या आघाडीला धक्का देत ममतांनी बंगालमध्ये लोकसभा निवडणूक एकट्याच्या बळावर लढण्याचा निर्णय घेतला. तसे असूनही राष्ट्रीय पातळीवर इंडियाचाच घटक असल्याची भूमिका तृणमूल मांडत राहिला. मात्र, स्वतंत्रपणे लढण्याच्या तृणमूलच्या भूमिकेविषयीची कॉंग्रेसची नाराजी दडली नाही. बंगालमधील प्रचारावेळी त्या पक्षांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. तृणमूलने एकट्याच्या बळावर लढूनही बंगालमध्ये दमदार कामगिरी केली. तर, कॉंग्रेसचीही देशभरातील एकूण कामगिरी लक्षणीय ठरली. त्यामुळे इंडियाचे बळ वाढले आहे. त्या आघाडीतील घटक पक्षांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रातील एनडीए सरकारविरोधातील राजकीय लढा एकदिलाने लढण्याचे ठरवले आहे. त्यामुळे चिदंबरम आणि ममता यांच्या भेटीचे महत्व वाढले आहे. त्या सदिच्छा भेटीत देशातील राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याचे समजते. कॉंग्रेस आणि तृणमूलमधील जवळीक वाढण्याच्या दृष्टीने ती भेट कळीची ठरण्याची शक्यता आहे.