Satara | माण-खटाव विधानसभा मतदार संघ काँग्रेसलाच मिळावा

गोंदवले, (वार्ताहर) – माण-खटाव विधानसभा मतदारसंघात हाताचा पंजा हरवला असल्याने तो परत मिळवण्यासाठी वरिष्ठांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगत माण खटाव विधानसभा मतदार संघावर राष्ट्रीय काँग्रेसचाच हक्क असल्याने तो काँग्रेसला मिळावा, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
दहिवडी येथे काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात जिल्हा आढावा बैठक पार पडली. यावेळी वरिष्ठांनी हा मतदार संघ काँग्रेसला मिळावा म्हणून वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करावेत, अशा प्रकारच्या सूचना मांडल्या.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य रणजितसिंह देशमुख, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष एम. के. भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, युवक जिल्हाध्यक्ष अमरजित कांबळे, माण महिला आघाडी अध्यक्षा नकुसा जाधव,
जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विष्णूबाळा अवघडे, राज्य कार्यकारिणी कृषी सेलचे सदस्य प्रा. विश्वंभर बाबर, माण तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, वसंत अवघडे, धर्मराज जगदाळे, वसंत भोसले, ऍड. संदीप सजगणे, विकास गोंजारी, पोपट खरात यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
रणजितसिंह देशमुख म्हणाले, आमचं ते आमचं आणि दुसऱ्याच पण आमचं, अशी भूमिका विरोधकांची आहे. हा मतदार संघ काँग्रेसच्या विचारांचा असून सर्व तळागाळातील लोकांमध्ये काँग्रेसची विचारसरणी रुजलेली आहे. लोकांच्या आग्रहाखातर काही कटू निर्णय घेतल्याने ‘आमचं ठरलय’ हा पॅटर्न अयशस्वी ठरला होता.
काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेला काँग्रेसचा गद्दार या मतदार संघात गाडण्यासाठी हा मतदार संघ काँग्रेसला मिळणे गरजेचे आहे. माण खटाव विधानसभा मतदार संघातील हीच भावना असल्याने इथली निवडणूक ही काँग्रेसच्या चिन्हावर लढली जावी.
प्रा. बाबर म्हणाले, भाजपला हाकलण्यासाठी काँग्रेसच्यावतीने देश पातळीसह सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, मित्र पक्षाकडून कुरघोड्या केला जात असल्यानेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. त्यामुळेच भिवंडी आणि सांगलीची लोकसभेची जागा ही काँग्रेसच्या हातातून गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
अल्पना यादव यांनी सर्वसामान्य महिलांवर या सरकारकडून अन्याय झाल्याचे मत व्यक्त करत भाजपला गाडून काँग्रेसला गतवैभव प्राप्त करण्यासाठी आम्ही वज्रमूठ बांधू, अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.
डॉ. सुरेश जाधव यांनी बूथ कमिटीमध्ये सोशल इंजिनिअरिंग करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच लोकसभेतील आपल्याबाबतची मित्रपक्षांची भूमिका जाणून घेऊन याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा करू असे सांगितले.
भाजप सरकार हद्दपार करणे गरजेचे
प्रभारी श्रीरंग चव्हाण यांनी काँग्रेसच्या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ही निवडणूक आघाडीला जिंकायला पाहिजे. भाजप सरकारला सर्वसामान्य जनता कंटाळली असल्याने त्यांना हद्दपार करणे गरजेचे आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
या मतदार संघासह इतर मतदार संघातील सर्वांची मते विचारात घेऊन याबाबतचा अहवाल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवू आणि निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.





