Congress: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी माजी खासदार मिलिंद देवरा, माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी देखील अनेक वर्षांची काँग्रेसची साथ सोडली. आता मराठवाड्यातील आणखी एक काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या गळ्याला लागण्याची शक्यता आहे.
माजी मंत्री, काँग्रस प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी आपल्या काँग्रेस सदस्याचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यामुळे आता पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बसवराज पाटील आपल्या समर्थकासह मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. बसवराज पाटील यांच्याकडून अद्याप पर्यंत पक्षप्रवेशाची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
मागील काही दिवसांपासून बसवराज यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतरआज मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पाटील भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
कोण आहेत बसवराज पाटील?
बसवराज पाटील हे मूळचे उस्मानाबाद तालुक्यातील उमरग्याच्या मुरूमचे रहिवासी आहेत. लिंगायत समाजाचे नेते असलेले बसवराज पाटील यांनी 2009 आणि 2014 अशा दोन निवडणुकांमध्ये औसा मतदार संघातून निवडणुक लढवत विजयी मिळवला. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये काँग्रेसने त्यांना राज्यमंत्रीपद दिले. पक्षाने त्यांना ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्रिपद दिले होते.
मात्र 2004 च्या निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला. तर 2019 मध्ये देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अभिमन्यू पवार यांच्याविरोधात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर आता ते लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश झाल्यास त्यांना ही संधी दिली जाणार का? हे पाहावे लागणार आहे.