Satara | काँग्रेसचे आज आनेवाडी व तासवडे टोलनाक्यावर आंदोलन

सातारा, (प्रतिनिधी) – राज्यातील महामार्गांंची अत्यंत दयनीय अवस्था झाली असताना मोठ्या प्रमाणात टोल वसुली होत आहे. याबाबत काँग्रेस पक्षाच्यावतीने आक्रमक भूमिका घेत राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
शनिवारी (दि.३) महामार्गावर आनेवाडी (ता. जावळी) व तासवडे (ता. कराड) येथे एकाच वेळ सकाळी ९ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव व जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी केले आहे.
कोल्हापूर ते पुणे दरम्यान महामार्गाची झालेली दुरवस्था व त्याचा नागरिक, प्रवाशी व वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे. एकीकडे महामार्गाची दुरावस्था असताना कोल्हापूर ते पुणे हद्दीतील सर्व टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात टोल वसुली करण्यात येत आहे.
महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावरील वसूल केला जाणारा टोल वाहन धरकांकडून वसूल करण्यात येऊ नये. या महामार्गावर प्रवाशांना होणारा त्रास व वाहनांचे होणारे नुकसान याबाबत काँग्रेस पक्षाच्या वतीने शनिवारी सकाळी ९ वाजता आनेवाडी व तासवडे टोल नाका येथे आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन एकाच वेळी एकाच दिवशी पुणे, सातारा, कराड येथे करण्यात येणार आहे.
तासवडे टोलनाक्यावर माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तर आनेवाडी टोल नाका येथे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे. सातारा, वाई, खंडाळा,
कोरेगाव जावळी, महाबळेश्वर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते आनेवाडी येथे तर कराड, पाटण इस्लामपूर, वाळवा तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे प्रदेश तसेच जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत तासवडे येथे आंदोलन करण्यात येणार आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन नरेश देसाई यांनी केले आहे.

