Congress Protest – पेट्रोल, डिझेलचे दर कमी करा, महागाई कमी करा; अन्यथा मोदी खुर्ची खाली करा, अशी घोषणाबाजी करत शहर महिला काँग्रेसने महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक प्रिया वंदना आणि शहर अध्यक्ष स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी कॅम्प भागात आंदोलन केले. आंदोलनात अनिता मकवाना, अंजली सोलापुरे, प्राजक्ता जाधव, कल्पना शिंदे, ज्योती अडागळे, रेखा जैन, नसीम शेख, जया गोयल, मीना शेंडगे आदी कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. पाच राज्यांतील निवडणुकांत भाजपने हजारो लिटर इंधन मोटारीतून प्रचारासाठी वापरले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारासाठी विमानातून प्रवास केला. इंधनवाढ होऊ देणार नाही, असे खोटे आश्वासन दिले. जागतिक स्थिती माहिती असतानाही मोदींनी इंधनाची, पैशांची उधळपट्टी केली आणि निवडणुका होताच जनतेला महागाईच्या खाईत लोटून परदेश दौऱ्यावर निघून गेले आहेत. ही कृतीच संतापजनक आहे, असा आरोप शिंदे यांनी केला. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे मुख्यमंत्री परदेशात थंड हवेच्या ठिकाणी जाऊन गुंतवणुकीचे करार करतात. या करारांमधून काहीही साध्य झाले नाही. उलट गेल्या तीन महिन्यांत दीड लाख कोटींची गुंतवणूक विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतली आहे. ही माहिती लपवून मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर निघून गेले आहेत, अशी टीका वंदना यांनी केली. देशापुढील आर्थिक संकट कसे निस्तरणार याचा खुलासा संसदेत करा, अशीही मागणी त्यांनी केली.