मुंबई : हरियाणाचा निकाल लक्षात घेऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जबरदस्त तयारी केली आहे. काँग्रेसने महाराष्ट्र निवडणुकीसाठी 11 वरिष्ठ निरीक्षक आणि दोन वरिष्ठ समन्वयकांची नियुक्ती केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र काँग्रेसची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. कोणत्या नेत्यावर सोपवली जबाबदारी ? या बैठकीत राज्यातील विभागांनुसार वरिष्ठ निरीक्षक आणि समन्वयांची नियुक्ती करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे. अशोक गेहलोत आणि जी परमेश्वर यांची मुंबई आणि कोकण विभागासाठी वरिष्ठ पर्यवेक्षकांची नियुक्ती केली. भूपेश बघेल आणि उमंग सिंगर यांनी विदर्भासाठी वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती केली. सचिन पायलट आणि उत्तमकुमार रेड्डी यांची मराठवाड्यासाठी नियुक्ती करण्यात आली. टी.एस.सिंहदेव आणि एम.बी.पाटील यांची पश्चिम महाराष्ट्रासाठी निरीक्षकांची नियुक्ती केली. उत्तर महाराष्ट्रासाठी नासिर हुसेन आणि डी अनसुय्या यांनी निरीक्षकांची नियुक्ती केली. मुकुल वासनिक आणि अविनाश पांडे यांची महाराष्ट्रासाठी वरिष्ठ समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली.