चाकण : येथील हॉटेल रुद्राक्ष येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने संघटन सुदृढीकरण अभियानांतर्गत महत्त्वपूर्ण बैठक व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत पक्ष संघटन अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला असून, विविध रिक्त पदांसाठी इच्छुकांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पार पडली. पुणे जिल्हा ग्रामीणचे निरीक्षक योगेश एच. सी. यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत खेड तालुक्यातील काँग्रेसची चळवळ अधिक गतिमान करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या बैठकीत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदासाठी दोन नावे सुचविण्यात आली, तर खेड तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदासाठी पाच इच्छुकांनी आपले अर्ज सादर केले. याशिवाय युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, ओबीसी, मायनॉरिटी, किसान काँग्रेस, सेवा दल अशा विविध सेलच्या पदांसाठीही मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाले आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला खेड तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या दिवंगत अध्यक्षा गीताताई मांडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी माजी आमदार रामहरी रुपनवर, जिल्हाध्यक्ष रंगनाथ चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष देविदास भन्साळी, आनंद मोहोळ, विश्वजीत हापसे, लहू निमगुणे उपस्थित होते. खेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत गोरे पाटील यांनी तालुक्यातील मागील ५० वर्षांतील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील घडामोडींचा सविस्तर आढावा सादर केला. निरीक्षक योगेश एच. सी. यांनी संघटनात्मक आढावा घेऊन कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संदीप नाईकरे यांनी केले. हेही वाचा : Pune District : मागासवर्गीय दफनभूमीवरील अतिक्रमणांना भीमटोला