नवी दिल्ली – प्रदीर्घ सस्पेन्स संपवत कॉंग्रेसने अखेर पुणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर करताना माजी आमदार मोहन जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. जोशी यांची लढत भाजपने उमेदवारी दिलेले पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी होईल.
लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने सोमवारी रात्री नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात जोशी आणि उल्हास पाटील (रावेर) या महाराष्ट्रातील दोन उमेदवारांचा समावेश आहे. पुण्यातील उमेदवाराची घोषणा लांबल्याने स्थानिक कॉंग्रेसजनांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. जोशी, अरविंद शिंदे या इच्छुकांबरोबरच नुकताच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रवीण गायकवाड यांच्या नावाची उमेदवारीसाठी जोरदार चर्चा होती. कॉंग्रेस निष्ठावंताला तिकीट देणार की बाहेरून आलेल्या नेत्याला याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले होते. अखेर पक्षाने जोशी यांच्या रूपाने निष्ठावंताला झुकते माप दिले. उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच कॉंग्रेसने पुण्यात प्रचाराचाही प्रारंभ केला. वातावरणनिर्मितीसाठी ती रणनीती अवलंबण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, कॉंग्रेसने गुजरातमधील एक आणि राजस्थानमधील सहा उमेदवार जाहीर केले. राजस्थानच्या जयपूर ग्रामीण मतदारसंघातून ऑलिम्पिकपटू कृष्णा पुनिया हिला उमेदवारी देण्यात आली आहे.