Congress MP Accident : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनाचा आज सकाळी नागपूरजवळ भीषण अपघात (Congress MP Accident) झाला. संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीला जाण्यासाठी भंडारा येथून नागपूर विमानतळाकडे निघालेल्या त्यांच्या ताफ्यातील कारला एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातातून खासदार डॉ. पडोळे आणि त्यांचे सहकारी सुदैवाने थोडक्यात बचावले आहेत. अपघाताची (Congress MP Accident) घटना आज सकाळी नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावर हल्दीराम कंपनीसमोर (उमरेड फाटा परिसर) घडली. डॉ. प्रशांत पडोळे हे भंडारा येथून आपल्या खासगी वाहनाने नागपूर विमानतळाकडे निघाले होते. वाहनांचा ताफा हल्दीरामसमोर पोहोचला असताना एका वेगवान ट्रकने त्यांच्या कारला मागून जोरदार धडक दिली. Congress MP Accident या धडकेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, एअरबॅग्जमुळे वेळीच मिळालेल्या संरक्षणामुळे खासदारांना गंभीर दुखापत झालेली नाही. काही जणांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, याच नागपूर-भंडारा मार्गावर डॉ. प्रशांत पडोळे यांच्यासोबत झालेला हा तिसरा अपघात आहे. यापूर्वी दोन वेळा देखील त्यांच्या ताफ्यातील वाहनाला ट्रकने धडक दिली होती. तिन्ही अपघात एकाच मार्गावर, तिन्ही वेळा ट्रकने दिलेल्या धडकीचे स्वरूप जवळपास सारखेच असल्याने अपघातामागे कटाची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अपघाताची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती समजताच काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी सोशल मीडियावरून अपघाताची गंभीर दखल घेण्याची आणि खासदारांच्या सुरक्षेची हमी मागितली आहे. डॉ. प्रशांत पडोळे हे अपघातानंतरही (Congress MP Accident) दिल्लीतील संसद अधिवेशनासाठी विमानाने रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी स्वतः अपघातातील क्षतिग्रस्त कारचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आपण सुखरूप असल्याचे सांगितले.