काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने- देवेंद्र फडणवीस

जालना: काँग्रेस पक्षाने आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद आयोजित करत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ‘जन आवाज’ असे जाहीरनाम्याला नाव देण्यात आले आहे. ‘हम निभाएंगे’ असे म्हणत काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी मंचावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंह, पी. चिदंबरम आणि सुरजेवाला यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. या जाहीरमान्यात रोजगाराचा मुद्दा, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला, मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचा आजचा जाहीरनामा म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने असून ते कधीच पूर्ण होणार नाहीत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते जालन्यात बोलत होते. तसेच काँग्रेसने हा जाहीरनामा कालच प्रसिद्ध व्हायला हवा होता म्हणजे हे एप्रिल फूल आहे हे समजले असते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

‘हम निभाएंगे’ जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे 

– न्याय (न्यूनतम आय योजना) अंतर्गत गरिबांना ७२ हजार रुपये देणार आहे. देशातील २० टक्के गरीब जनतेच्या थेट खात्यात हे पैसे जमा होतील.
– मार्च २०२० पर्यंत २२ लाख सरकारी जागांची भरती केली जाईल. १० लाख तरूणांना ग्रामपंचायतीमध्ये नोकरी देण्यात येईल.
– उद्योगधंदा सुरू करण्यासाठी ३ वर्षापर्यंत परवानगीची गरज नसेल.
– मनरेगा १०० दिवसांऐवजी वाढवून १५० दिवसांचा रोजगार देणार
– शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प
– शेतकऱ्यांनी कर्ज न फेडल्यास गुन्हा ठरणार नाही  जीडीपीच्या ६ टक्के शिक्षणावर खर्च करणार
– पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणणार
– सत्तेत आल्यास भारतीय दंड संहितेमधील कलम १२४अ देशद्रोहाशी संबंधित कलम वगळू

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.