नवी दिल्ली : भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून इराणमध्ये शिक्षण घेत असलेल्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आणि कल्याणाची हमी देण्याची मागणी केली आहे. इराणमधील ढासळती अर्थव्यवस्था आणि वाढत्या हिंसाचारामुळे भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाल्याचे चिब यांनी पत्रात नमूद केले. अलीकडील हिंसक घटनांमध्ये किमान १० जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि भारतातील त्यांच्या कुटुंबीयांना आश्वस्त करण्यासाठी भारत सरकारने तातडीने राजनैतिक पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली. इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षा अनिश्चिततेच्या हवाली सोडता येणार नाही. परदेशात शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक भारतीय विद्यार्थ्यासोबत भारतीय युवक काँग्रेस ठामपणे उभी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. २०२२ नंतर इराणमध्ये ही सर्वात मोठी निदर्शने असून, २२ वर्षीय महसा अमिनीच्या पोलीस कोठडीतील मृत्यूनंतर देशभरात आंदोलनांना सुरुवात झाली होती. अमिनीला हिजाब न घातल्याच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आले होते.