बंगळुरू : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपदी बढती मिळेल अशी चर्चा त्या राज्यात कॉंग्रेसने सरकार स्थापन केल्यापासून आहे. मात्र, त्यांना वेटिंगवर रहावे लागणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कर्नाटकमध्ये दीड वर्षापूर्वी विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये बाजी मारून कॉंग्रेसने सरकार स्थापन केले. मात्र, मुख्यमंत्रिपदावरून सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात जोरदार रस्सीखेच झाली.
अखेर कॉंग्रेस श्रेष्ठींनी सिद्धरामय्या यांना पसंती दिली. त्यावेळी शिवकुमार यांना निम्म्या कार्यकाळानंतर मुख्यमंत्री बनवण्याचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा रंगली. ती चर्चा अद्यापही सुरू असते. अर्थात, तसा कुठला फॉर्म्युला ठरला असल्याच्या बाबीला कॉंग्रेसच्या गोटातून अजून तरी दुजोरा देण्यात आलेला नाही. तरीही अधूनमधून चर्चा होत असतानाच सिद्धरामय्या यांच्यामागे कथित मुडा घोटाळ्यावरून चौकशीचा ससेमिरा लागला. त्यामुळे भाजप आणि जेडीएस या कर्नाटकमधील विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.
कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आल्याने सिद्धरामय्या पद सोडतील, असा अंदाज वर्तवणाऱ्या चर्चांना पुन्हा उधाण आले. अशात काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये विधानसभेच्या ३ जागांसाठी पोटनिवडणूक झाली. त्या तिन्ही जागा कॉंग्रेसने जिंकल्या. त्यामुळे जनतेने सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याचे मानले गेले. त्यातून त्यांचे स्थान आणखी भक्कम बनले आहे.
पोटनिवडणूक निकालानंतर कर्नाटकमधील कॉंग्रेसचे प्रमुख नेते सातत्याने मुख्यमंत्री बदलाची शक्यता फेटाळत आहेत. आता खुद्द शिवकुमार यांनी सत्तावाटपाचा कुठला फॉर्म्युला ठरला नसल्याचे म्हटले आहे. कॉंग्रेसमधील कुणीच कथित फॉर्म्युल्याविषयी बोलू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मुख्यमंत्री बनण्याची आकांक्षा बाळगून असणारे शिवकुमार त्या पदावर विराजमान होण्यासाठी प्रतीक्षा करण्यास तयार असल्याचे सूचित होत आहे.