चंदीगड : पंजाबममध्ये अलिकडेच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये सत्ताधारी आम आदमी पार्टीने (आप) सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून विजय मिळवला, असा आरोप पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी केला. ‘आप’ जिल्हा परिषदांच्या ३४७ पैकी २२० जागा जिंकल्याचा दावा करत असली, तरी प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रियेतून केवळ १३६ जागा जिंकल्या गेल्या असून त्यातही फेरफार करण्यात आला असल्याचा दावा वारिंग यांनी केला आहे. वारिंग यांच्या मते, जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसने ६२, शिरोमणी अकाली दलाने ४६, भाजपने ७ तर इतर पक्षांनी ११ जागा जिंकल्या. पंचायत समित्यांमध्ये ‘आप’ने १,५३१ जागा जिंकल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रियेतून ८३८ जागाच जिंकल्या गेल्या, उर्वरित ठिकाणी दबाव, धमकी आणि प्रक्रियात्मक गैरवापर झाला आहे. तसेच, मोठ्या प्रमाणावर बहिष्कार, बिनविरोध विजय, उमेदवारी अर्ज रद्दीकरण आणि सत्ताधारी पक्षाच्या बाजूने जबरदस्तीने निकाल जाहीर केल्याचे दावा देखील वारिंग यांच्याकडून करण्यात आला आहे. आप आणि काँग्रेसच्या कामगिरीत फारसा फरक नसल्याचे सांगत, अकाली दल व भाजप मागे असल्याचा दावाही त्यांनी केला. अकाली दलाने काँग्रेसपेक्षा चांगला स्ट्राइक रेट असल्याचा केलेला दावा फेटाळत, कमी जागांवर लढून मिळालेल्या यशावरून एकूण कामगिरी ठरवता येत नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, आपने ग्रामीण निवडणुकांत मोठा विजय मिळवल्याचा दावा केला असून काँग्रेस दुसऱ्या, अकाली दल तिसऱ्या आणि भाजप चौथ्या क्रमांकावर राहिल्याचे पक्षांकडून सांगण्यात आले आहे.