बेळगाव – महात्मा गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कर्नाटक काँग्रेसने मंगळवारी बेळगावी येथे जय भीम, जय बापू, जय संविधान रॅली काढली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनीही यात सहभाग घेतला.
याप्रसंगी खरगे म्हणाले, भाजप गेल्या अनेक वर्षांपासून संविधान कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. देशात संविधान नसते तर देशात अराजकता माजली असती. यामुळेच आजकाल लोकांना गांधी आठवतात. त्यांच्या कार्याबद्दल, त्याग आणि योगदानाबद्दल लोक त्यांचा आदर करतात.
त्याचवेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हटले, महात्मा गांधी कट्टर हिंदू होते आणि काँग्रेसचा गांधींच्या हिंदुत्वावर विश्वास आहे. गांधी नेहमी प्रभू रामाचे नाव घेत असत. नथुराम गोडसेने त्यांची हत्या केली तेव्हा गांधींनी हे राम म्हटले होते. भाजपने नेहमीच गांधींना हिंदुविरोधी म्हणून मांडले, पण ते 100 टक्के खोटे आहे. गांधी कधीच हिंदू धर्माच्या विरोधात नव्हते, पण त्यांना हिंदू धर्मात सुधारणा करायची होती. हिंदू-मुस्लिमांना सख्खे भाऊ म्हणून जगताना पाहायचे होते. गांधींनी स्वतःला स्वातंत्र्यलढ्यापुरते मर्यादित न ठेवता प्रशासनाबाबत महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे दिली, असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले, गांधीजींचे निधन झाले असले तरी त्यांची मूल्ये अजूनही जिवंत आहेत. हा केवळ काँग्रेसचा कार्यक्रम नाही. राष्ट्रपिता आणि अहिंसा चळवळीचे नेतृत्व जगातील सर्व नेत्यांनी मान्य केले. भाजपवर निशाणा साधत ते म्हणाले, गोडसे पक्ष काय बोलले ते आम्हाला ऐकायचे नाही. ज्यांना स्वातंत्र्य चळवळीची माहिती नाही. त्याग म्हणजे काय हे त्यांना माहीत नाही, असा निशाणाही त्यांनी साधला.
संविधानासाठी बलिदान देण्यासही तयार –
काँग्रेस नेत्या तथा वायनाडच्या खासदार प्रियंका गांधींनी यावेळी आक्रमक भाषण करताना गृहमंत्री अमित शहांच्या विधानाचा सडकून समाचार घेतला. त्या म्हणाल्या, राहुल गांधी हे दिवस रात्र संविधानाच्या संरक्षणासाठी झटत आहेत. त्यामुळे भाजपला त्यांची भिती वाटते. आणि त्याचमुळे त्यांच्या विरोधात विविध गुन्हांची नोंद करण्यात आली. त्यांच्यामागे ईडीचाही ससेमिरा लावण्यात आला. परंतु, आम्ही या सर्व गोष्टींना घाबरणार नाही, तसेच कोणीही संविधानाची वेगळी व्याख्या मांडण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. त्यासाठी वेळप्रसंगी आम्ही जिवाचे बलिदान देण्यासही कमी पडणार नाही, असेही प्रियंका पुढे म्हणाल्या.