कॉंग्रेसच समाजात फूट पाडत आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

अलमोडा / डेहराडून – धर्म, जात, प्रदेश आदी मुद्द्यावरून कॉंग्रेसच समाजात फूट पाडीत आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. उत्तराखंड मधील प्रचार सभेत ते बोलत होते. या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकांनी भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा संधी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. भाजप येथे सत्तेवर आली तर डबल इंजिन सरकार या राज्याच्या कामी येईल आणि राज्याचा वेगाने विकास होईल असे ते म्हणाले.
कॉंग्रेसचा अजेंडा हा कायम तोडफोडीचाच राहिला आहे असे नमूद करताना मोदी म्हणाले की सब मे दालो फूट मिल कर करो लूट अशीच त्यांची राजनिती आहे असे ते म्हणाले. भेदभावाची नीती सोडली तरच एखाद्या राज्याचा विकास होऊ शकतो असे नमूद करताना त्यांनी भाजपने या राज्यात केलेल्या विकास कामांची यादी सादर केली.
ते म्हणाले की, आम्हाला उत्तराखंडचा विकास हिमालयाच्या उंचीवर न्यायचा आहे. या राज्यातील केदारनाथ सारख्या तीर्थ स्थळावर नवनवीन कामे हाती घेतली गेली आहेत. पुढील पाच वर्षात येथील पर्यटनाचाहीं आम्ही मोठ्या प्रमाणात विकास करू असे ते म्हणाले. कुमॉऊ भागात आमच्या सरकारने 17 हजार कोटी रूपयांच्या विकास कामांना प्रारंभ केला आहे असेही त्यांनी नमूद केले.
उत्तराखंडच्या सीमा भागात उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांचा नागरीकांना तर लाभ होईलच पण देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनेही मोठी विकास कामे येथे केली जात आहेत असे ते म्हणाले. त्या उलट कॉंग्रेस या राज्यात स्वतंत्र मुस्लिम विद्यापीठ सुरू करण्याच्या प्रयत्नांत आहे असे ते म्हणाले. त्यामुळे चुकीच्या लोकांच्या हातात येथील सरकार देऊ नका असे आवाहन त्यांनी केले.





