Balasaheb Thorat | राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या निकालानंतर महायुतीला मोठे यश मिळाल्याचे स्पष्ट झाले. तर महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. मात्र यात काँग्रेसला काहीसे चांगले यश मिळाले आहे. दरम्यान, नगरपालिका निवडणुकीतील पराभवावरून महाविकास आघाडीतील पक्षांमध्येच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जामखेड नगरपालिकेतील पराभवानंतर काँग्रेसवर गंभीर आरोप केले.जामखेड नगरपरिषद निकालानंतर काँग्रेसला भाजपची ‘बी टीम’ म्हणणाऱ्या रोहित पवारांना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पवार स्वत:च काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद करत नसल्याने त्यांना हे अपयश आल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे. तर महायुतीकडून प्रचंड प्रचार झाला. हेलिकॉप्टरमधून येणे-जाणे, बॅगा उतरतानाही दिसल्या. आमच्याकडे ना हेलिकॉप्टर ना विमान, तरीही नागरिकांनी आमच्या कामावर आणि विश्वासावर मतदान केलं, असे थोरात म्हणाले. बाळासाहेब थोरातांचा पलटवार बाळासाहेब थोरात म्हणाले की, “गेल्या विधानसभा निवडणूक रोहित पवार यांच्याबद्दल काँग्रेसमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली. ते काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद करत नाहीत,त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतात. त्यामुळे आपण त्यांना याची पूर्वीच कल्पना देत काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधा आणि चर्चा करा, असे सांगितले होते. परंतु त्यांनी ते ऐकले नाही. त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा केली नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला. निवडणूक लढताना तडजोड करावी लागते, सर्वांना सोबत घ्यावे लागते. हा आग्रह मी केला होता, पण तो मान्य झाला नाही. त्यामुळे काँग्रेसने आपले अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न केला,” असे थोरात म्हणाले. Balasaheb Thorat | रोहित पवारांचा आरोप काय? रोहित पवार म्हणाले होते की, “जामखेड पालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला काँग्रेस पक्षाने तिकीट दिले. काही अपक्षांनी तसेच धर्मनिरपेक्ष व समतेचा जप करणाऱ्या काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करून भाजपची बी टीम म्हणून काम करत जातीयवादी पक्षाच्या विजयाला हातभार लावला आणि लोकही त्यांच्या या तिरक्या चालीला बळी पडले. त्यामुळे यापुढे काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांवरही कसा विश्वास ठेवायचा?’ असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. हेही वाचा: अमेरिकेकडून H1B व्हिसावरील निर्बंध आणखी कडक ; सर्व अर्जदारांना ‘हे’ करणे बंधनकारक