भाजपच्या बालेकिल्ल्यात कॉंग्रेसही जोरात

पर्वती मतदार संघ – 212

भाजपचा बालेकिल्ला होऊ पाहणारा पर्वती मतदार संघ हा भाजपला सर्वाधिक मताधिक्‍क्‍य देणारा मतदार संघ आहे. त्यामुळे कसब्यानंतर आता या मतदार संघाकडे अधिक लक्ष लागून राहिले आहे. या मतदार संघात भाजपकडून चारच जण इच्छुक असले, तरी कॉंग्रेसकडून विद्यमान नगरसेवकांसह अन्य कार्यकर्त्यांनी पक्षाकडे जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

या मतदार संघात मागील निवडणुकीत सध्या भाजपच्या विद्यमान शहराध्यक्ष असलेल्या माधुरी मिसाळ या 69 हजार 90 मतांच्या फरकाने निवडून आल्या होत्या. तर, त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत या मतदार संघातून शहरातील सर्वाधिक म्हणजे 27 पैकी 23 नगरसेवकही निवडून आले आहेत. याशिवाय मतांची संख्या पाहता एकूण मतदानापैकी 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मतदान भाजपला झाले आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे 2 तर कॉंग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी 1 नगरसेवक निवडून आले आहेत.

सॅलिसबरीपार्क, बिबवेवाडी, हिंगणे, वडगाव बुद्रुक, जनता वसाहत, दांडेकर पूल, दत्तवाडीचा काही भाग, लक्ष्मीनगर, सहकारनगर, पद्मावती, मित्रमंडळ, पर्वती दर्शन, नवीपेठेचा काही, अपर इंदिरानगर, सिंहगड रस्त्यावरील काही भाग या मतदार संघात येतो.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळे त्यांनी वेगवेगळी निवडणूक लढवली आणि या ठिकाणी भाजपला पहिल्या क्रमांकाची तर शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसनेही आघाडी मोडल्याने त्यांचा क्रमांक अनुक्रमे तिसरा आणि चौथा गेला होता.

मिश्र लोकवस्ती असलेला हा भाग असून, जास्तीतजास्त वसाहतींचे पुणे असे या भागाला म्हणता येईल. यामध्ये पूरग्रस्त वसाहत, पीमसी कर्मचारी वसाहत पोलीस वसाहत असा वसाहतींचा समावेश आहे. बिबवेवाडी, अप्पर-सुप्पर हे भाग मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांचे आहेत. बिबवेवाडीही भाग काहीसा याच पठडीतील आहे. तरीही याठिकाणी बहुतांश मतदान 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या बाजूने होते. विद्यमान आमदार मिसाळ यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढवून तेथे विजय मिळवला होता. विद्यमान आमदारांसह, भाजपमधील चार जण या मतदार संघात इच्छुक आहेत.

मागील निवडणुकांमध्ये बसलेला फटका लक्षात घेता, कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. त्यातूनच पर्वती मतदार संघ कॉंग्रेसच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधील विद्यमान नगरसेवकांनी यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here