“हरियाणात कॉंग्रेस झाली आहे बाप- लेकाची पार्टी”

चंदीगड – हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांच्या सूनबाई किरण चौधरी या प्रदीर्घ काळ कॉंग्रेसमध्ये होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. चौधरी यांनी आता कॉंग्रेस नेते भूपेंद्र हुडा आणि त्यांचे पुत्र दीपेंद्र हुडा यांच्यावर टीका केली असून हरियाणातील कॉंग्रेस पक्ष केवळ पिता आणि पुत्राचा पक्ष झाला असल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे.
किरण चौधरी यांच्या समवेत त्यांच्या कन्या श्रुती चौधरीही भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत. भाजपने किरण चौधरींना आता राज्यसभेची उमेदवारी दिली असून किरण यांचे राज्यसभेवर निवडून जाणे जवळपास निश्चित असल्याचे मानले जाते आहे.
किरण यांनी कॉंग्रेस सोडली तेंव्हा त्यांनी हुडा पिता- पुत्राचे थेट नाव घेत त्यांना लक्ष्य केले होते व पक्षाला रामराम केला होता. मात्र आता टीका करताना त्यांनी हुडांचे नाव घेतले नाही. लोकसभा निवडणुकीत हरियाणात कॉंग्रेसची ताकद निश्चितच वाढली आहे. तथापि, किरण चौधरी यांनी पक्ष सोडल्यामुळे ज्या भागात माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांचा प्रभाव आहे तेथे कॉंग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे.
एका इंग्रजी वर्तमान पत्राला दिलेल्या मुलाखतीत चौधरी म्हणाल्या की हरियाणात कॉंग्रेस नावाची कोणती वस्तूच नाही. येथे केवळ पिता आणि पुत्राचे चालते. जो कोणी पक्षात मोठे होण्याचा प्रयत्न करतो त्याची उंची कमी केली जाते. हे दोघे पिता- पुत्र स्वत:ला पक्षात असुरक्षित मानतात. भूपेंद्र हुडा यांना आपल्या मुलासाठी मैदान मोकळे करायचे आहे, मात्र दीपेंद्र त्या लायक नाहीत.
या दोघांच्या विरोधात अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. हे दोघे कॉंग्रेससाठी कधीच काही करणार नाहीत. वस्तुस्थिती तर ही आहे की त्यांनी हरियाणात कॉंग्रेसच समाप्त केली आहे. जे काही थोडेफार शिल्लक राहीले असेल तेही संपवण्याचे या दोघांचे काम सुरू आहे. राज्यात कॉंग्रेस व्हेंटीलेटरवर असून शेवटचे श्वास घेते आहे. आता भारतीय जनता पार्टीकडून आपल्या विधानसभा निवडणुकीसाठी जी जबाबदारी दिली गेली आहे त्याचे आपण पूर्ण जबाबदारीने पालन करू.





