Congress President : काँग्रेसला मिळाला नवा प्रदेशाध्यक्ष ! ‘या’ नव्या चेहऱ्याला मिळाली संधी

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. काँग्रेसला अवघ्या 16 जागांवर विजय मिळवता आला. त्यानंतर राज्यातील काँग्रेस नेतृत्व बदलाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्यातच, नाना पटोले यांनीही आपण राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. त्यानुसार, नाना पटोले यांनी मंगळवारी दिल्लीवारीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर लवकरच राज्यात काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याचे म्हटले होते.
हर्षवर्धन सपकाळ कॉंग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष
अखेर आज काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख यांची नावे आघाडीवर असतानाच हर्षवर्धन सपकाळ यांनी बाजी मारली आहे. ओबीसी नेते म्हणून विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर यांच्या नावाची देखील प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होती.
कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ?
हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे निष्ठावान नेते आहेत. हर्षवर्धन सपकाळ हे 2014 ते 2019 या काळात बुलढाणा मतदारसंघाचे आमदार होते. तसेच ते बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. हर्षवर्धन सपकाळ हे राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसच्या राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील विविध कार्यक्रमांमध्ये नेहमी सहभागी होत असतात. याशिवाय सपकाळ हे गांधी परिवाराचे जवळचे मानले जातात. काँग्रेसच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रमात ते नेहमीच सक्रिय सहभागी राहिले आहेत. राज्यस्तरावर त्यांचे नाव फारसे चर्चेत नसले तरी संघटनेमध्ये ते एकनिष्ठतेने काम करत असतात.






