नवी दिल्ली : भाजपची सत्ता असणाऱ्या आसाममध्ये वेळापत्रकानुसार पुढील वर्षीच्या मार्च-एप्रिलमध्ये विधानसभा निवडणूक होईल. ती निवडणूक विचारात घेऊन कॉंग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून गुरूवारी कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने दिल्लीत पक्षाच्या आसाममधील प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. आसाममध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचा सलग दुसरा कार्यकाळ सुरू आहे. पुढील वर्षी भाजपच्या सत्तेला १० वर्षांचा कालावधी पूर्ण होईल. प्रदीर्घ काळ सत्तेत असल्याने आसाममध्ये भाजपविरोधी वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याचे आडाखे कॉंग्रेस बांधत आहे. त्यातून मिशन आसामसाठी कॉंग्रेस सज्ज होत आहे. आगामी निवडणुकीत पक्षाच्या रणनीतीची चाचपणी करण्याच्या उद्देशातून अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये आसामचे प्रदेशाध्यक्ष भुपेन बोरा, प्रभारी जितेंद्र सिंह, खासदार गौरव गोगोई आदी नेते सहभागी झाले. भाजपपुढे तगडे आव्हान उभे करण्यासाठी पक्षातील एकजुटीची गरज बैठकीत अधोरेखित करण्यात आली.