Satara: “महिला आरक्षण ५४३ लोकसभा जागांमध्येच देण्याची काँग्रेसची मागणी आहे. मात्र, ८५० हा आकडा कोणत्या आधारावर पुढे आणला जात आहे, याबाबत सरकारने स्पष्टीकरण करावे.” अशी मागणीकाँग्रेसचे माजी आमदार अभय छाजेड यांनी केली. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका करत केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यासंदर्भात येथील जिल्हा काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महिलांच्या प्रतिनिधित्वाबाबत स्पष्ट भूमिका मांडत आरक्षणाच्या अंमलबजावणीतील विलंब आणि आकडेवारीतील विसंगतीवर अभय छाजेड यांनी भाष्य केले. काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुषमा राजेघोरपडे, राजेंद्र शेलार, रजनी पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. अभय छाजेड म्हणाले, ‘‘महिला आरक्षणासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने संघर्ष केला असून स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते संसदपर्यंत महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्यात काँग्रेसची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. २०२३ मध्ये महिला आरक्षण कायदा मंजूर करण्यात आला असला तरी त्याची अंमलबजावणी २०२९ पासून करण्याचे सांगितले जात आहे.’’ सध्या जनगणना प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र, ती वेळेत पूर्ण होईल का, याबाबत शंका आहे. भाजपचा हेतू कायद्यात बदल करण्याचा असल्याचे दिसते, असा आरोप त्यांनी केला. महिलांचा विश्वासघात झाला आहे. युद्धजन्य परिस्थिती आणि आर्थिक अडचणींचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. राज्यघटनेच्या मूल्यांना धक्का देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच शेती आणि कामगार कायद्यांबाबतही सरकारने घाईघाईने निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपप्रमाणे काँग्रेस पक्षाचेही संघटन मजबूत असून, महिलांच्या हक्कांसाठी काँग्रेस कटिबद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. महिला आरक्षणाचा प्रश्न केवळ राजकीय नसून सामाजिक न्यायाशी संबंधित असल्याचे मत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.