“९८ दिवसांत २५ हल्ले, मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात दहशतवादात वाढ” – कॉंग्रेस

श्रीनगर –केंद्र सरकारला जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले रोखण्यात सपशेल अपयश आले आहे. उलट, जम्मू विभागात संपुष्टात आलेला दहशतवाद पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात वाढला आहे, असे टीकास्त्र कॉंग्रेसने शनिवारी सोडले.
कॉंग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी श्रीनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून मोदी आणि त्यांच्या सरकारवर टीकेची झोड उठवली. मोदींनी तिसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेण्याला ९८ दिवस झाले. त्या कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये २५ दहशतवादी हल्ले झाले. त्या हल्ल्यांत २१ सुरक्षा जवान शहीद झाले. तर, २८ जवान जखमी झाले. त्याशिवाय, १५ नागरिक मृत्युमुखी पडले, तर ४७ नागरिक जखमी झाले. त्याचे उत्तर कोण देणार, असा सवाल सुप्रिया यांनी केला.
केंद्र सरकारने ऑगस्ट २०१९ मध्ये राज्यघटनेचे कलम ३७० हटवले. त्यामुळे जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्दबातल झाला. त्या निर्णयांचे समर्थन करताना केंद्र सरकारकडून जम्मू-काश्मीरात शांतता प्रस्थापित होण्याविषयी विश्वास व्यक्त केला जात होता. त्या भूमिकेची खिल्ली सुप्रिया यांनी उडवली.
किरकोळ मुद्द्यांवरही मोदी ट्विट करतात. मात्र, शहीद जवानांविषयी भावना व्यक्त करणारे कुठले ट्विट त्यांनी २०१९ या वर्षापासून केलेले आढळत नाही. त्यांनी कुठल्या दहशतवादी हल्ल्याची दखल घेतली आहे का याची खातरजमा करण्यासाठी त्यांची सोशल मीडिया अकाऊंटस् चेक करा. मोदींनी दहशतवादी हल्ल्यांची दखल घेतल्याचे आढळणार नाही. कारण, जम्मू-काश्मीरमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे चित्र त्यांना जगासमोर उभे करायचे आहे, अशी उपरोधिक टिप्पणीही त्यांनी केली.





