नवी दिल्ली : मतचोरी, सदोष मतदारयाद्या, बुथस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) मृत्यूच्या घटना, अरूणाचल प्रदेशवर चीनचा दावा आदी मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा भाजपचा खटाटोप आहे. त्यातून तो पक्ष आमच्या नेत्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटसचा विषय पुढे करत आहे, असा पलटवार कॉंग्रेसने केला. भाजपच्या आरोपांचा समाचार घेण्यासाठी कॉंग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपशी संबंधित काही सोशल मीडिया अकाऊंटस परदेशांमधील ठिकाणांवरून ऑपरेट केली जात आहेत. गुजरात भाजपचे एक्स हँडल आयर्लंडस्थित आहे. अदानी समुहाची अकाऊंटस जर्मनीतून ऑपरेट होतात. ती सर्व अकाऊंटस भारतविरोधी आहेत का किंवा भारतविरोधी कृत्यांमध्ये गुंतली आहेत का, असा प्रतिसवाल त्यांनी केला. विविध मुद्द्यांवरून भाजपला सोशल मीडियावरून प्रश्न विचारले जात आहेत. त्या प्रश्नांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न तो पक्ष करत आहे. भाजप व्यापक मतदार घोटाळ्याचा मुख्य शिल्पकार आहे. तब्बल २० वर्षे सत्तेत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निवडणुकांमधील यशाचा स्ट्राईक रेट ९३ टक्के कसा काय असू शकतो? देशासमोर अनेक गंभीर मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांपासून लक्ष इतरत्र वळवण्यासाठी भाजप सोशल मीडिया अकाऊंटसचा निरर्थक विषय मांडत आहे. सोशल मीडिया कंपन्यांनी आधीच स्पष्टीकरण दिले आहे. तांत्रिक दोष, प्रवास, व्हीपीएनमुळे अकाऊंटसचे ठिकाण बदलू शकते असे त्या कंपन्यांनी नमूद केल्याचे त्यांनी म्हटले.