अहमदाबाद : गुजरातच्या सूरतमधील प्रसिद्ध हिरे उद्योग संकटात सापडला आहे. त्या उद्योगातील कामगारांपुढे उपजीविकेचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे, असा दावा कॉंग्रेसने गुरूवारी केला. तसेच, स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडे लक्ष घालण्याची मागणी केली. कॉंग्रेसचे गुजरात प्रदेशाध्यक्ष शक्तिसिंह गोहिल यांनी रशिया-युक्रेन युद्धामुळे हिरे उद्योगाला मंदीने ग्रासल्याकडे आणि कामगारांना बेरोजगारीची समस्या भेडसावू लागल्याकडे लक्ष वेधले. अनेक कामगारांनी रोजगार गमावले. त्यातील काहींनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. भारतात कटींग आणि पॉलिशिंगसाठी रशियन हिऱ्यांची आयात होते. त्या हिऱ्यांची निर्यात पाश्चिमात्य देशांच्या बाजारपेठांत तसेच चीन, संयुक्त अरब अमिराती आणि हॉंगकॉंगला होते. मात्र, ७ देशांच्या समुहाने (जी ७) रशियन हिऱ्यांवर बंदी घातल्याने सूरतमधील उद्योगापुढे अभूतपूर्व पेच निर्माण झाला आहे. रशियात मोठ्या प्रमाणात कच्च्या हिऱ्यांचे खनन होते. त्या हिऱ्यांवरील बंदीमुळे गंभीर स्वरूपाचा पेच निर्माण होऊनही केंद्र आणि राज्य सरकारांनी कामगारांना दिलासा देण्यासाठी कुठलेही पाऊल उचलले नाही, असा आरोप त्यांनी केला. अमेरिका, ब्रिटनसह जी ७ देशांकडे रशियन हिऱ्यांवरील बंदीचा मुद्दा केंद्र सरकारने का उपस्थित केला नाही? परराष्ट्र मंत्रिपदाची धुरा सांभाळणारे एस.जयशंकर गुजरातमधून राज्यसभा सदस्य बनले आहेत. तसे असूनही त्यांनी संबंधितांची एकही बैठक घेतली नाही. तसेच, हिरे उद्योगाशी संबंधित समस्या इतर देशांकडे उपस्थित केल्या नाहीत. गुजरातमध्ये रोजगार पुरवण्याबाबत आघाडीवर असणाऱ्या क्षेत्रांत हिरे उद्योगाचा समावेश होतो. त्या उद्योगावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सुमारे २५ लाख कुटूंबे अवलंबून आहेत. सूरतसह गुजरातमधील विविध ठिकाणी हिरे पॉलिशिंग कारखाने आहेत. भारताच्या हिरे निर्यातीत लक्षणीय घसरण झाल्याचे अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट होते. ती निर्यात २०२२ यावर्षी २३ अब्ज डॉलर्सवरून २०२३ मध्ये १६ अब्ज डॉलर्स एवढी झाली. त्यामध्ये चालू वर्षी (२०२४) आणखी घट होऊन ती १२ अब्ज डॉलर्स एवढी होण्याचा अंदाज आहे. त्याशिवाय, २०२३ मध्ये पॉलिश्ड हिऱ्यांची किंमत ५ ते २३ टक्क्यांनी घटली, असा दावाही गोहिल यांनी केला.