होय, पैसे सापडले मात्र त्यात ‘आमचा’ सहभाग नाही : अरुणाचल भाजप अध्यक्षांचा दावा

नवी दिल्ली : देशभरामध्ये सध्या लकसभा निवडणुकांचे जोरदार वारे वाहत असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. अशातच आज काँग्रेसकडून अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री तथा भाजपचे अरुणाचलप्रदेश अध्यक्ष यांच्यावर ‘कॅश फॉर व्होट’चा आरोप लावण्यात आला होता. आता याबाबत अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री तथा अरुणाचल भाजप अध्यक्षांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेसचे मुख्यप्रवक्ते रणदीप सुरजेवाल यांनी याबाबत एका पत्रकार परिषदेद्वारे भाजपवर आरोप लावले होते. यावेळी बोलताना, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जरी आज अरुणाचलप्रदेशात भाषण देत असले तरी आज अरुणाचलप्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू आणि अरुणाचल भाजप अध्यक्ष तापीर गाओ यांच्या ताफ्यातील गाडीमधून अधिकाऱ्यांनी १.१८ कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याने भाजप पैशांच्या बदल्यात मतं मिळविण्याचे घाणेरडे राजकारण खेळत आहे हे स्पष्ट होत आहे.” असं ते म्हणाले होते.

काँग्रेसच्या या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अरुणाचलप्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू म्हणाले की, “पैशांच्या बदल्यात मतं मिळविण्याचे घाणेरडे राजकारण ही काँग्रेसची प्रवृत्ती आहे. आज सापडलेली रोकड ही भाजप उमेदवाराच्या गाडीमध्ये सापडली असून याबाबत निवडणूक आयोगाकडून चौकशी सुरु आहे.”

दरम्यान याबाबत अरुणाचल भाजप अध्यक्ष तापीर गाओ यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून ते म्हणतात, “सदर रक्कम ही माझ्या अथवा मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्या गाडीतून जप्त करण्यात आली नसून ही रक्कम भाजप उमेदवार डांगी परमो यांच्या गाडीतून जप्त करण्यात आली असून या प्रकरणात माझा, मुख्यमंत्र्यांचा, अथवा भाजपचा काहीही संबंध नसून सदर रक्कम ही त्या उमेदवाराची वैयक्तिक रक्कम होती.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.