पणजी – पुढील वर्षी होणा-या गोवा विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाने आज पहिली यादी जाहीर केली आहे. विशेष, म्हणजे सर्वात अगोदर उमेदवारी जाहीर करत कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. पहिल्या टप्प्यात आठ उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली असून अन्य उमेदवारांची यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी म्हापशातून सुधीर कानोलकर, तळेगाव मतदारसंघातून टोनी रॉड्रिग्ज, फोंडामधून राजेश वेरेणकर, मरमुगाव मतदारसंघातून संकल्प अमोणकर, कुर्तोरिममधून अलेक्सो ल्युरेन्को, मडगावमधून दिगंबर कामत आणि अन्य दोन नावांची घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, गोव्या विधानसभेची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता असून तृणमूल कॉंग्रेसनेही या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी युती केली आहे. तर आपनेही या निवडणुकीसाठी कंबर कसली असल्याने ही निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे.
भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याचे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले होते. मात्र कॉंग्रेस आणि तृणमूल यांच्यात सूर जमण्याची शक्यता नसल्याने याचा फायदा कुणाला होणार, याची जोरदार चर्चा राज्यात रंगली आहे.