एकवटलेल्या विरोधकांची निवडणुकीनंतर आघाडी शक्‍य-राहुल गांधी

मोदींचा पराभव हे पहिले उद्दिष्ट
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव हे एकवटलेल्या विरोधकांचे पहिले उद्दिष्ट आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांची आघाडी शक्‍य आहे, अशी भूमिका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी मांडली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राहुल यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला व्यापक मुलाखत दिली. त्यावेळी ते म्हणाले, लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी मोदींचा पराभव हे सर्वच विरोधी पक्षांचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

देशाची सामाजिक वीण आणि देशाच्या संस्था उद्‌धवस्त करण्यापासून भाजपला रोखणे हे विरोधकांचे लक्ष्य आहे. विकासाला चालना देऊन अर्थव्यवस्थेला गती देणे, रोजगार निर्मिती करणे, सामाजिक सलोख्याची निश्‍चिती करणे, अन्याय-असमानता हटवणे यांसाठी विरोधक एकत्र आले आहेत. एवढेच नव्हे तर, मोदींना विरोध करण्यासाठी देशाची जनता सरसावली आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

भाजपच्या विरोधात लढताना विरोधकांमधील फाटाफूट समोर आली आहे. एकत्रित लढा दिला न जाण्यावरून काही विरोधी पक्ष कॉंग्रेसला दोष देत आहेत, याकडे मुलाखतकाराने राहुल यांचे लक्ष वेधले. त्यावर ते उत्तरले, देशाच्या हितासाठी भाजपचा पराभव गरजेचा असल्याबाबत विरोधकांमध्ये मतैक्‍य आहे. विविध राज्यांत धर्मनिरपेक्ष शक्ती एकत्र आल्या आहेत. देशभरात भाजपशी दोन हात करण्यासाठी विरोधकांनी तगडे उमेदवार दिले आहेत, असे म्हणत त्यांनी पश्‍चिम बंगालचे उदाहरण दिले. तिथे धर्मनिरपेक्ष व्यवस्था जिंकेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. कॉंग्रेसचा समावेश नसला तरी उत्तरप्रदेशात आघाडी अस्तित्वात आहे. महाराष्ट्र, झारखंड, जम्मू-काश्‍मीर, कर्नाटक, तामीळनाडू राज्यांत आघाड्या स्थापन झाल्या आहेत. आघाड्या कुठे नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.