बुकावू (कॉंगो) : कॉंगोच्या अग्नेयेकडील एका खाणीवरील पूल कोसळल्यामुळे किमान ३२ जण ठार झाले आहेत. स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. लुआलाबा प्रांतातील मुलोंदो येथील कालांदो खाणीवरील हा पूल शनिवारी अचानक कोसळला. पुलावर प्रचंड गर्दी झाल्याने हा पूल कोसळला असल्याचे मानले जाते आहे. या भागात सध्या संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या भागात भूस्खलनाचा धोका असल्याने नागरिकांनी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पण अवैध खदकाम करणाऱ्यांनी आपले काम सुरूच ठेवले होते. गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी सैनिकांनी गोळीबार केल्याने खाण कामगारांमध्ये धावपळ सुरू झाली. हे कामगार पुलावर गेल्याने पुलाचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत ३२ जण ठार झाले असल्याचे प्रांतीय गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. मात्र मृतांची संख्या ४० असण्याचे माध्यमांनी म्हटले आहे. कॉंगोमध्ये अवैध खाण उद्योगामध्ये नेहमी अशा दुर्घटना होत असतात. कॉंगोमध्ये इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या लिथियम आयर्न बॅटऱ्या करण्यासाठीची आवश्यक कोबाल्ट सारखी खनिजे मोठ्या प्रमाणावर उत्पादित केली जातात. कॉंगोमधील या खाण उद्योगातल्या ८० टक्के उद्योगांवर चिनी कंपन्यांचे नियंत्रण आहे. या खाणींमध्ये बालमजूरी, सुरक्षा उपायांचा वानवा आणि भ्रष्टाचारासारख्या समस्या आहेत.