Konkan farmers protest: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत महाराष्ट्र काँग्रेसने शुक्रवारी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला. गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मोर्चा सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, शिवसेनेचे विनायक राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा दावा सपकाळ यांनी केला. हेही वाचा – महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; 24 IPS अधिकाऱ्यांची बदली, पहा संपूर्ण यादी कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी गेल्या तीन महिन्यांपासून आर्थिक मदतीसाठी आंदोलन करत असून, आंबा उत्पादकांना प्रति हेक्टर पाच लाख रुपये, तर काजू उत्पादकांना प्रति हेक्टर तीन लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. लोकशाही मार्गाने होणारी आंदोलने आणि मोर्चे रोखून सरकार शेतकरी, कामगार आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला.