प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीसाठीची प्रभाग रचना अंतिम करण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असताना सर्वच राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी महापालिकेत सक्रिय झाले आहेत. भाजपचे मंत्री, आमदार आणि माजी नगरसेवक यांची आयुक्तांच्या भेटींसाठी महापालिकेत गर्दी वाढली आहे. प्रभाग रचनेबाबत शहरात राजकीय चर्चांना उधाण आल्याने ही गर्दी वाढली असल्याची महापालिका वर्तुळात चर्चा आहे.राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरू केल्यानंतर पुणे महापालिकेतील प्रभाग रचना अंतिम करण्यासाठी निवडणूक आयोगाने ४ ऑगस्टपर्यंतचा कालावधी दिला आहे. यानुसार महापालिकेने रचना तयार करून नगररचना विभागाला सादर करायची आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून प्रभाग रचनेत हस्तक्षेप केल्याच्या अफवा पसरल्या आहेत. नेमकी स्थिती घालून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, तसेच काही आमदारांनी गुरुवारी महापालिकेत हजेरी लावली होती. मात्र, काही पदाधिकाऱ्यांना भेट मिळाली असली, संध्याकाळी भेट न मिळाल्याने अनेक पदाधिकाऱ्यांना माघारी फिरावे लागले. त्यामुळे प्रभाग रचना अंतिम होईपर्यंत राजकीय पक्षांकडून आयुक्तांवर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आरोप केले जात आहेत.