पुणे – कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने गेल्या आठवड्यात शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्याची मोठी कारवाई करत कसून तपास सुरू ठेवला आहे. त्यात या कोल्हापूरच्या पोलीस पथकाने पुण्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयात तळ ठोकून अधिकाऱ्यांकडे टीईटी परीक्षेबाबत सखोल चौकशी करत प्रश्नपत्रिकांचे संच तपासासाठी ताब्यात घेतले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यातील प्रत्येक शिक्षकाला टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने २३ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यात टीईटी परीक्षा घेतली. या वर्षी गेल्या वर्षांच्या तुलनेत परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत सुमारे सव्वा लाखाने वाढ झाली. त्यातच परीक्षेच्या आधी एक दिवस कोल्हापूरमध्ये टीईटी परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीबद्दल पोलिसांना माहिती मिळाली होती. तीन लाख रुपयांना ही प्रश्नपत्रिका विकली जाणार होती. त्यासाठी परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांकडून पैसेही घेतले गेले होते. याबाबत पकडलेल्या आरोपींनी पोलिसांना कबुलीही दिलेली आहे. मात्र या टोळीकडे प्रश्नपत्रिका सापडली नव्हती. दरम्यान या प्रकरणाचा कोल्हापूर पोलिसांनी पुढील तपास सुरूच ठेवला आहे. आणखी काही धागेदोरे हाती लागतात का ? या अनुषंगाने या कोल्हापूर पोलीस पथकाचा तपास सुरू आहे. त्यासाठीच पोलिसांचे एक पथक बुधवारी पुण्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयात दाखल झाले होते. परीक्षा परिषदेकडून ही प्रश्नपत्रिका कोणाला छापण्यासाठी दिली जाते. या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रापर्यंत कक्षा पोहचवल्या जातात. प्रश्नपत्रिका छापणारी आणि परीक्षा केंद्रापर्यंत प्रश्नपत्रिका पोहचवणारी गोपणीय संस्था कोणती? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिसांच्या पथकाने केला. प्रश्नपत्रिकेचा संचही परीक्षा परिषदेकडून पोलिसांनी ताब्यात घेतला. परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून परीक्षेची माहिती जाणून घेतल्यानंतर पाथक निघून गेले. टीईटी परीक्षा अतिशय पारदर्शकपणे घेण्यात आली असून यात कोणताही गैरप्रकार झालेला नाही. परीक्षेचा पेपर फुटलेला नाही, असा दावा परीक्षा परिषदे कडून करण्यात आला आहे.