पुणे – लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना मूळगावी जाण्यासाठी एसटी बसेस 18 मेपर्यंत सुटणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. पण, यासंदर्भात नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. त्यामुळे, स्वारगेट एसटी स्थानकावर नागरिकांनी गर्दी केल्याचे सोमवारी दिसून आले.
राज्य सरकारने एसटी बसेस उपलब्ध करून दिल्याने महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांत जाण्यासाठी नागरिकांची सोय झाली आहे. त्यामुळे एसटी स्थानकावर नागरिकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे स्थानकावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर, बसेससंदर्भात माहिती देऊन प्रवाशांना परत पाठविण्यात येत आहे. मात्र, गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नोंदणी केलेल्या यादीनुसार परप्रांतीय मजुरांसाठी बसेस उपलब्ध आहेत. गेल्या तीन दिवसापासून नगर, जळगाव या जिल्ह्यांतील रहिवाशांना सोडण्यात आल्याचे एसटी महामंडळाने सांगितले आहे.