यूपीएससीप्रमाणे जाहीर करण्याची मागणी
नवीन पदभरती बंद करण्याचा निर्णय मागे घ्या
पुणे – करोना पार्श्वभूमीवर पुढे ढकलेल्या परीक्षांच्या तारखा अखेर केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) जाहीर करून विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर केला. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही (एमपीएससी) तारखा जाहीर करणे आवश्यक आहे. परीक्षांचा तारखा कधी जाहीर करणार? असा प्रश्न स्पर्धा परीक्षा उमेदवारांकडून उपस्थित होत आहे.
करोनामुळे स्थगित झालेल्या “यूपीएससी’च्या विविध परीक्षांसाठीचे नवे वेळापत्रक आयोगाने जाहीर केले. त्यात सिव्हिल सर्व्हिस पूर्व व मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्याने उमेदवारांना अभ्यासाची तयारी करणे शक्य झाले. आता लॉकडाऊन शिथिल केल्याने एमपीएससीने परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे आता स्पर्धा परीक्षांचे अभ्यास करणारे उमेदवारांचे एमपीएससीच्या वेळापत्रकाकडे लक्ष लागले आहे.
बंदीने सर्वत्र निराशा
एकीकडे लाखो उमेदवार एमपीएससीच्या परीक्षांच्या तारखांच्या प्रतीक्षेत आहेत. याउलट राज्य सरकारने करोना पार्श्वभूमीवर पुढील एक वर्ष नव्याने नोकरभरती न करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत स्पर्धा परीक्षेचे उमेदवारही चिंतेत आहेत. दरम्यान, पहिले एक वर्ष विनावेतन काम करण्याची उमेदवारांची तयारी आहे. परंतु, नोकरभरतीवरील बंदी उठवावी, अशी मागणी एमपीएससी स्टुटंड राईटस्चे महेश बडे यांनी केली आहे.
परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करा
“एमपीएससी’ने तीन महत्त्वाच्या परीक्षा करोनामुळे पुढे ढकलल्या. त्यांची तयारी उमेदवारांनी केली होती. मात्र, बहुतांश उमेदवार गावाकडे गेले आहेत. पुढच्या परीक्षांच्या तारखाच जाहीर नसल्याने शहरात येऊन अभ्यासाची तयारी कशी करावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परीक्षेचे वेळापत्रक तातडीने जाहीर करणे आवश्यक आहे. तरच परीक्षेचे नियोजन करणे शक्य आहे. त्यादृष्टीने आयोगाकडून पावले उचलली जातील, अशी अपेक्षा उमेदवारांकडून व्यक्त होत आहे.
या परीक्षा पुढे ढकलल्या
“राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020′ आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट -ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020′ या दोन्ही परीक्षा अनुक्रमे 26 एप्रिल आणि 10 मे रोजी नियोजित वेळापत्रकानुसार होणार होती. करोनामुळे या दोन्ही परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलल्या. त्याचप्रमाणे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व दि. 17 मे रोजी होणारी परीक्षाही पुढे ढकलली आहे. या तिन्ही परीक्षा उमेदवारांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून, त्यासाठी लाखो उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
विविध पदांच्या परीक्षांचे निकाल रखडले
2019च्या राज्य सेवा परीक्षेचा निकाल, तसेच लिपीक, टंकलेखन, पीएसआय, कर सहायक, विद्युत अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षांचा निकाल अद्यापही जाहीर करण्यात आलेले नाहीत. लॉकडाऊन कालावधीत निकाल जाहीर करण्यात काही अडचणी असतील, हे मान्य आहे. मात्र, यापूर्वीच ते लागणे अपेक्षित होते. आता तरी निकालासाठी आयोगाकडून त्वरित कार्यवाही होईल, असा प्रश्न उमेदवारांतून उपस्थित होत आहे.
यूपीएससीने 5 जून रोजी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे एमपीएससी का निर्णय घेऊ शकत नाही, हा प्रश्न आहे. एमपीएससीच्या काही परीक्षांच्या निकालाबद्दल, तारखेबद्दल अजून संभ्रम आहे. त्यामुळे आता यूपीएससीने विद्यार्थ्यांचा गोंधळ कमी केल्यानंतर एमपीएससीकडूनही वेळीच निकाल आणि नव्या तारखा जाहीर करणे आवश्यक आहे.
– महेश बडे, एमपीएससी स्टुडंट राईटस्