पंढरपूर : पंढरपूरच्या विठुरायाचे ऑनलाईन दर्शन सशुल्क करण्यासाठी शनिवारी (8 फेब्रुवारी) बोलावलेल्या बैठकीत काही राजकीय पक्ष आणि संघटनांचे प्रतिनिधी आल्याने वारकरी महाराज आणि या मंडळीत जोरदार बाचाबाची झाल्याने विठ्ठल मंदिरात आज अभूतपूर्व गोंधळ झाला. यानंतर या निर्णयाला विरोध करीत महाराज मंडळींनी बैठकीवर बहिष्कार टाकत बाहेर पडल्याने हा विषय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
एक वर्षांपूर्वी मंदिर समितीने ऑनलाईन दर्शनासाठी 100 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. याला वारकरी संप्रदायातून टोकाचा विरोध झाल्याने हा निर्णय थांबवला होता. शनिवारी (8 फेब्रुवारी) मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा याच विषयावर विठ्ठल मंदिरात महाराज मंडळींची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेस , संभाजी ब्रिगेड आणि काही इतर संघटनांचे पदाधिकारी आल्याने वारकरी महाराज आणि यातील काही पदाधिकाऱ्यांच्यात वादावादी सुरु झाल्यावर वारकरी पाईक संघाचे राणा महाराज वासकर, रामकृष्ण वीर महाराज यांचेसह इतर बैठकीवर बहिष्कार टाकत निघून गेले.
यानंतरही बैठक सुरु ठेवण्यात आली. यामध्ये वैष्णव वारकरी सेना, वराकारे फडकरी दिंडी समाजासह काही संघटनांनी या निर्णयाचे समर्थन केले. दरम्यान, राज्यातील बहुतांश मोठ्या देवस्थानात सध्या सशुल्क दर्शन सुरु झाले असून यामुळे विठ्ठल मंदिराच्या उत्पन्नात वर्षाला किमान 14 कोटी रुपयाची वाढ होणार असल्याची समितीची भूमिका आहे. तर विठ्ठलाच्या दर्शनाचा बाजार मांडू देणार नसल्याची विरोध करणाऱ्या वारकरी संप्रदायातील बहुतांश महाराज मंडळींची भूमिका असल्याने सध्या तरी हा निर्णय पुन्हा मागे पडणार आहे.