नवी दिल्ली – गुन्हे करून तिहार कारागृहात पोचलेल्या कैद्यांसाठी सध्या त्याठिकाणी शिक्षणाचे वर्ग भरवले जात आहेत. विशेष म्हणजे त्यांना शिकवणारे शिक्षकही कैदीच आहेत. रोज सुमारे दीड तास अशिक्षित कैद्यांना लिहायला आणि वाचायला शिकवले जाते. शिकलेले कैदी स्वतःला पुढच्या वर्गासाठी सज्ज करतात.
विशेष म्हणजे इथे विदेशी कैदी भारतीय भाषा शिकण्यात सरस ठरत आहेत. कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कारगृहातील कैदी परस्परांची मातृभाषा शिकतात. कारागृहातील विदेशी कैदी हिंदी शिकतात तर भारतीय कैदी विदेशी कैद्यांची भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर एकमेकांची संस्कृती. सणवार, राहणीमान या गोष्टीदेखील ते जाणून घेतात. त्यातून परस्परांचे एकाकीपण दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
जेलमध्ये असलेल्या विदेशी कैद्यांमध्ये नायजेरिया, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान बरोबरच अनेक देशांचे लोक आहेत. या शिक्षण वर्गाचा परिणाम म्हणून आता अनेक अशिक्षित कैदी अंगठ्याऐवजी स्वाक्षरी करू लागले आहेत. या कैद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आता कारागृह प्रशासनातर्फे त्यांना पोस्टकार्डे पुरवली जातात. त्याद्वारे ते नातेवाईकांना, परिचितांना मनातील गोष्टी लिहून पाठवतात.
कारागृह प्रशासनाच्या सांगण्यानुसार कारागृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे न वळता स्वयंपूर्ण बनण्याच्या दृष्टीने हे शिक्षण उपयुक्त ठरणार आहे. तिहार कारागृहातील नव्वद टक्के कैदी हे गरीब वर्गातील आहेत. त्यापैकी अनेकांनी शाळेचे तोंडही पाहिलेले नाही. अशा कैद्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी कारागृह प्रशासनाने पढो-पढाओ हे अभियान सुरु केले आहे.
कारागृहात असेही कैदी येतात ज्यांना वाचता येत नाही, मोजता येत नाही. त्यांना विशेष सॉफ्टवेअरद्वारे व्यावहारिक गणिताचे ज्ञान दिले जाते. त्याचबरोबर त्यांना कौशल्याची कामेही दिली जातात. जेणेकरून त्यांना सर्वप्रकारचे शिक्षण मिळावे. अभ्यास सुरु झाल्यावर स्वाभाविकपणे कैद्यांमध्ये नवा आत्मविश्वास तयार होतो.