फ्लिपकार्ट, अॅमेझॉनला टक्कर देण्याची तयारी

फक्त दोन तासांत मिळणार घरपोच डिलिव्हरी
पुणे – भारतामध्ये फ्लिपकार्ट, अॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्स कंपन्या गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. या कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नियमाचा भंग करत आहेत, अशी तक्रार वेळोवेळी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन ट्रेडर्स (सीएआयटी) या व्यापाऱ्याच्या संघटनेने केली आहे. आता या संघटनेने भारतातील दुकानदारांचे एक वेगळे स्वदेशी बनावटीचे “भारत ई-मार्केट’ हे ई-कॉमर्स पोर्टल सुरू करायचे ठरविले आहे.
सीएआयटीने यासाठी डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड ट्रेड या वाणिज्य मंत्रालयातील विभागाबरोबर सहकार्य करार केला आहे. हे पोर्टल अंतिम टप्प्यात असून लवकरच सुरू केले जाईल, असे या संघटनेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. यासाठी या संघटनेने देशांतर्गत कार्यरत ग्लोबल लिंक या माहिती तंत्रज्ञान कंपनीची मदत घेतली आहे. ग्लोबल लिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर वकील यांनी सांगितले की, जागतिक पातळीवरील ई-कॉमर्स कंपन्यांपेक्षा आमचे पोर्टल एकदम वेगळे असणार आहे.
या पोर्टलवरून सदस्यांना प्राधान्यक्रमाची किंवा जास्त सूट देण्याची पद्धत अवलंबवली जाणार नाही. या पोर्टलवर ग्राहकांनी खरेदीसाठी नोंदणी केल्यास त्यांच्या जवळच्या रिटेल दुकानातून त्यांना किफायतशीर दरात दोन तासांमध्ये वस्तू मिळणार आहेत. यामध्ये बुटापासून किराणा मालापर्यंतच्या वस्तूंचा समावेश आहे. 90 शहरातील 6,300 व्यापारी या पोर्टलशी संलग्न झाले आहेत. ही संख्या आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्याचबरोबर आम्ही सरकारच्या सर्व नियमांची अंमलबजावणी करणार असून या पोर्टलवर तयार झालेला डेटा हा भारतातच राहणार आहे.’





