पिंपरी | विधानसभा व महापालिका निवडणुका एकत्रित घ्या

पिंपरी, (प्रतिनिधी) – निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक पुढे ढकलून महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसोबत विधानसभेचीदेखील निवडणूक घ्यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चिंचवड विधानसभा शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सध्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, पिंपरी चिंचवड महापालिकांसह राज्यातील 29 महानगरपालिका, 385 पैकी 257 नगरपालिका, नगरपंचायती, 34 पैकी 26 जिल्हा परिषदा आणि 351 पैकी 289 पंचायत समित्यांवर प्रशासकराज आहे. उर्वरित ठिकाणच्या निवडणुका वर्ष-दीड वर्षावर आल्या आहेत. प्रशासकीय कारभारावर कोणाचाही वचक नाही.
तसेच त्यांच्याविरोधात कुठे दादही मागता येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे सामान्य नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्याचा सर्वाधिक फटका हा वंचितांना बसत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. प्रलंबित महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायचे धाडस निवडणूक आयोगाने दाखवावे, शी मागणी या पत्रकात केली आहे.





