पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध; सर्वपक्षीयांकडून डोंबिवली बंदची हाक

Pahalgam Terrorist Attack | दहशतवाद्यांनी पहलगाम येथील हल्ल्यात निष्पाप २६ पर्यटकांचा बळी घेतला. यातील महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश आहे. यात डोंबिवलीच्या तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याने या हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंद पाळण्यात येत आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन डोंबिवलीकरांवर शोकाकुल अंत्यसंस्कार करण्यात आले.
दहशतवाद्यांच्या क्रूर कृत्याचा निषेध करण्यासाठी सर्व पक्षीयांनी गुरुवारी (ता.२४) डोंबिवली बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये शहरातील सर्व नागरिक, व्यापारी, व्यावसायिकांनी सहभागी होण्याचे आवाहन सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी केले आहे. त्यानुसार आज डोंबिवली बंदला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. संजय लेले, अतुल मोने, हेमंत जोशी या तिन्ही पर्यटकांच्या पार्थिवावर डोंबिवलीतील शिव मंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांच्या पार्थिवाचे डोंबिवलीत अंत्यदर्शन घेतले. तिन्ही पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेले जात असताना नागरिकांना शोक अनावर झाला. यावेळी संतप्त नागरिक ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देत होते.
नागरिकांची घोषणाबाजी सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित जनतेला जे हव आहे तेच होणार, अशा शब्दात भावना व्यक्त करून दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकार कटिबध्द असल्याचे सांगितले. Pahalgam Terrorist Attack |
गणबोटे आणि जगदाळे यांचे पार्थिव पुण्यात दाखल
दुसरीकडे, आज पुणे एअरपोर्टवर गुरुवारी पहाटे गणबोटे आणि जगदाळे यांचे पार्थिव दाखल झाले आहे. काही वेळात दोघांच्याही पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून मित्र होते. त्यामुळे हे दोन्ही कुटुंबीय एकत्रच काश्मीर फिरायला गेले होते. मात्र, या दोन्ही कुटुंबातील पुरुषांना दहशतवादी हल्ल्यात जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. Pahalgam Terrorist Attack |
हेही वाचा:
Sharad Pawar : शरद पवारांनी घेतले संतोष जगदाळे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन





