सवलतीच्या “बूस्टर’ने बांधकाम उत्पन्न वाढले

  • महापालिकेला मिळले रु. 90 कोटींचे उत्पन्न
  • नवीन बांधकामांचे प्रस्ताव वाढण्यास सुरूवात

पुणे – करोनामुळे आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच जाहीर झालेल्या देशव्यापी लॉकडाउनचा फटका महापालिकेच्या बांधकाम विभागाला बसला होता. गेल्या त्यानंतर पहिल्या सहामाहीत अवघे 30 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. मात्र, घटलेले उत्पन्न लक्षात घेऊन महापालिकेने 50 लाखांच्या पुढील बांधकाम शुल्क टप्प्या टप्प्याने भरण्यास तसेच एकाच वेळी शुल्क भरणाऱ्यांना सवलत देण्यात आल्याने बांधकाम शुल्कातून पालिकेस तब्बल 90 कोटींचे उत्पन्न मिळाले असून या वर्षातील उत्पन्नाचा आकडा 130 कोटींवर पोहचला आहे.

 

तर आता पुन्हा “न्यू नॉर्मल’ला सुरूवात झाल्याने पुढील चार महिन्यांत या शुल्कात आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. मिळकतरानंतर वर्षाला सरासरी सुमारे 700 ते 800 कोटींचे उत्पन्न मिळवून देणारा हा महत्वाचा स्रोत असताना बांधकाम क्षेत्रातील मंदी, महारेरा, नोटबंदी यामुळे गेल्या काही वर्षांत महापालिकेस बांधकाम शुल्कातून मिळणारे उत्पन्न कमालीचे घटले आहे. त्यातच यंदा लॉकडाउनमुळे शहरातील बांधकामे ठप्पच झाली होती. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो लोकांच्या रोजगाराचाही प्रश्न, तसेच पालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला.

 

दरम्यान, बांधकाम प्रस्ताव यावेत, याकरिता महापालिकेच्या बांधकाम विभागाने बांधकाम शुल्क टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत उपलब्ध करून दिली. त्याला स्थायी समितीनेही मान्यता दिली. याचा फायदा होत असून त्यानंतर प्रस्ताव येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला असून नवीन प्रकल्पांचे प्रस्ताव वाढण्यास सुरूवात झाली आहे. परिणामी, सवलत दिल्यानंतर सुमारे 90 कोटींनी उत्पन्न वाढले आहे.

 

बांधकाम शुल्कात सवलत दिल्याने नवीन बांधकामांचे प्रस्ताव वाढण्यास सुरूवात झाली आहे. परिणामी, उत्पन्नही वाढण्यास सुरूवात झाली असून गतवर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न कमी असले, तरी पुढील काही महिन्यांत ते आणखी वाढेल. या अनुषंगाने उपाययोजना करण्यात येत आहेत

– प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, मनपा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.