Satara | सातारा जिल्हा बँकेत विकास अधिकारयाना संगणकीकरणाचे प्रशिक्षण

सातारा, (प्रतिनिधी) – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण प्रशिक्षण केंद्रात बँकेच्या विकास अधिकारयाना (मास्टर ट्रेनर्स) संगणकीकरणाचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचे उदघाटन जिल्हा उपनिबंधक माळी यांच्या हस्ते झाले.
यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे तसेच नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक चौधरी उपस्थित होते. याप्रसंगी बँकेचे शेतीकर्जे विभागाचे उपव्यवस्थापक भंडारे यांनी स्वागत केले.
जिल्हा उपनिबंधक माळी म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केंद्र शासनाचे विकास सेवा संस्था संगणीकरण कामकाजात डाटा मायग्रेशन व संस्थाची माहिती भरण्याच्या कामकाजात मोलाचे सहकार्य केले आहे. जिल्हातील निवड केलेल्या ९३३ विकास सेवा संस्था पैकी डाटा कॅपचर टूल८४३ संस्था पूर्ण करण्यात महत्वाचा वाटा आहे.
विकास सेवा संस्थासंगणीकरण कामकाज त्वरित पूर्ण होण्यासाठी बँके मार्फत रिसोर्स पर्सन उपलब्ध करून दिले आहे. त्यांना संगणकिय साहित्य व नेट कनेक्टिव्हिटीची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालय व तालूका सहाय्यक निबंधक कार्यालया मार्फतही विकास सेवा संस्था संगणीकीय कामकाज ठिकाणी भेटी देवून बँकेच्या समन्वयाने कामकाजावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.
नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक चौधरी म्हणाले, केंद्र शासनाचे विकास संस्थांचे संगणकीकरण प्रकल्पाचे देश पातळीवर कामकाज सुरु आहे. सातारा जिल्ह्यातील जिल्हा बँकेचे सभासद विकाससेवा संस्थांचे आजवर झालेले संगणकीकरणाचे कामकाज उल्लेखनीय असून यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहकार्य करून मोलाची कामगिरी केली आहे. सदर कामकाजात नाबार्डकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सरकाळे म्हणाले,जिल्ह्याचे कृषी व ग्रामीण भागात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे योगदान फार मोठे आहे. जिल्ह्यातील बँकेच्या सभासद विकास संस्थांच्या सक्षमीकरणासाठी बँकेने अनेकविध कार्यक्रम राबविले असून ९६३ संस्थांपैकी ९५० संस्था नफ्यात आणल्या आहेत.
तसेच केंद्र शासनाचे विकास सेवा संस्था संगणकीकरणाकरिता जिल्ह्यामध्ये निवड केलेल्या विकास संस्थांचे कामकाजात बँकेने संपूर्ण सहकार्य असून संगणकीकरणाचे कामकाज लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. कार्यक्रमास बँकेचे सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे तसेच, व्यवस्थापक शेखर शिंदे, तसेच बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.





