कोयनानगर – पश्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणार्या आणि पाटण तालुक्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाचे पाटण तालुक्यातील काम येत्या 15 डिसेंबरपूर्वी पूर्ण करावे. हे काम दर्जेदार करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांना दिले. दौलतनगर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या महामार्गाच्या कामाची गती गेल्या काही महिन्यांपासून मंदावल्याने तालुक्यातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर लगेचच काम सुरू करावे. ते मुदतीत पूर्ण करावे. कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड मान्य केली जाणार नाही. नळपाणीपुरवठा योजनेतील पाइपलाइनचे काम गतीने पूर्ण करा. जिथे जिथे अतिक्रमणे झाली आहेत, ती तात्काळ हटवावीत. त्यासाठी महसूल प्रशासन आणि पोलिसांची मदत घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. या बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार, अधीक्षक अभियंता दयानंद विभुते, कार्यकारी अभियंता श्रुती नाईक, उपअभियंता महेश पाटील उपस्थित होते.